आमचा देवा धर्माला विरोध नाही.

बातम्या

पनवेलच्या आश्रमात नार्कोटेक औषधे

Sakal 8 सप्टेंबर 2016 - 12:00 AM IST
Date : Thursday, Sep.8,2016.

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित वीरेंद्र तावडे याच्या चौकशीला धक्कादायक वळण मिळाले आहे. विशेष तपास पथकाने सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमावर दोन दिवसांपूर्वी टाकलेल्या छाप्यात नार्कोटेक औषधे आढळली आहेत. मनावर आणि विचारांवर प्रभाव टाकणारी ही औषधे आहेत. संमोहनासाठी ही औषधे वापरली जात असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी औषधांचा हा साठा जप्त केला आहे. जप्तीच्यावेळी अन्न व औषध विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. आता याबाबतची पुढील कार्यवाही हा विभागच करणार आहे. डॉक्‍टरांच्या सांगण्यावरूनच ही औषधे आश्रमात आणल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. आता ही औषधे नेमकी कोणासाठी आणली व तिचा वापर कशासाठी झाला हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिस याबाबतचा अहवाल आज न्यायालयात सादर करणार आहेत.

तावडे याला पोलिसांनी पानसरे यांच्या हत्याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी पोलिसांनी त्याला दोन दिवसांपूर्वी पनवेल येथे नेले होते. तावडेच्या मोटारसायकलचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिस या आश्रमात गेले होते. पोलिसांना तेथे त्याची मोटारसायकल काही सापडली नाही. मात्र, औषधांचा साठा आढळून आला आहे. या औषधांच्या साठ्याविषयी अधिक चौकशी केल्यानंतर ती मती गुंग करणारी नार्कोटेक औषधे असल्याचे लक्षात आले. तपासासाठी गेलेल्या पोलिस पथकाने तत्काळ अन्न व औषध खात्याच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. या अधिकाऱ्यांच्या समोरच पंचनामा झाला. त्यानंतर ही औषधे सील करण्यात आली.

ही औषधे नेमकी कशासाठी वापरतात, याची माहितीही पोलिसांनी घेतली. त्यातून मिळालेली माहिती धक्कादायक आहे. कारण या औषधाच्या वापरामुळे एकादी व्यक्ती संमोहीतही होऊ शकते. त्यामुळे या औधषांचा वापर संस्थेत कशासाठी करण्यात आला, याची चौकशी पोलिस करणार आहेतच; पण याबाबतची स्वतंत्र कार्यवाही अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होण्याची शक्‍यता आहे. या औषधांबाबत संस्थेच्या काही कागदपत्रांत उल्लेख आहे का, याची खातरजमा पोलिस करत आहेत.

तावडेला तपासासाठी पनवेलला सनातनच्या आश्रमात नेल्यानंतर तिथे काही प्रमाणात नार्कोटेक औषधे मिळून आलेली आहेत. त्याचा सविस्तर पंचनामा अन्न व औषध प्रशासनाने केलेला आहे. याची नोंदही तपासासाठी आलेल्या पथकाकडून घेतली आहे. याबाबतची सविस्तर माहिती उद्या (ता. 8) आम्ही न्यायालयात सादर करू. गुन्ह्यासाठी अशा औषधांचा वापर केला गेला काय, याचीही चौकशी करण्यात येईल.
संजयकुमार, विशेष तपास पथकाचे प्रमुख

शेड्युल एच वनमधील औषधे
या ठिकाणी चौकशीच्या वेळी पोलिसांना एच वन शेड्युलमधील औषधे सापडली आहेत. ही औषधे देताना डॉक्‍टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) आवश्‍यक आहे. त्याचे रजिस्टरही स्वतंत्र ठेवावे लागते. तसेच या औषधांचा साठा करण्याबाबत काही नियम आणि बंधने आहेत. शेड्युल एच वनमधील नार्कोटेक ड्रग्ज म्हणून ओळखली जाणारी zapiz, Amisul, etizol, Qute अशा चार पद्धतीची औषधे मिळून आली आहे. ही औषधे मनावर आणि विचारांवर प्रभाव करणारी आहेत. ही औषधे एम.डी. मानसोपचारतज्ज्ञच देऊ शकतो. संमोहनासाठी आणि मानसिक रुग्णांवरील उपचारासाठी त्याचा वापर केला जातो. ही औषधे या ठिकाणी एका डॉक्‍टरच्या सांगण्यावरूनच आली आहेत, परंतु आता ही औषधे तिथे का आणि कोणासाठी आणली याची चौकशी व त्याच्या नियमांची खातरजमा अन्न व औषध विभाग करणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई होण्याची शक्‍यता आहे.